नवे मोड्युलर आय. सी. यु, ओ. टी.चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !
जिल्ह्यातील रुग्णालयासाठी १५ कोटीचे अत्याधुनिक सिटी स्कॅन उपलब्ध करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
योगेश चौधरी / जळगाव
जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अपडेट झालेले जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सर्वसामान्य रुग्णालय झाले असून इथल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, गोर गरिबांच्या आरोग्य सेवेसाठी हे अत्यंत महत्वाचे होते. म्हणून गेल्या एक वर्षात दोन्ही रुग्णालयाचे अत्याधुनिकरणासाठी 50 कोटी पेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आला होता. आता जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिपीडिसी च्या माध्यमातून १५ कोटीचे अत्याधुनिक सिटी स्कॅन लवकरच उपलब्ध करणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांच्या हस्ते सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी नवे मोड्युलर आय. सी. यु. आणि मोड्युलर ऑपरेशन थियटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकुश, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, विविध विद्या शाखाचे प्रमुख डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे आहे मोड्युलर आयसीयु
या मॉड्युलर आयसीयु सदर आयसीयुमध्ये स्वयंचलित १४ रुग्ण खाटा असून रुग्णाच्या स्थितीबद्दल सतत माहिती देणारे १४ मल्टिपॅरा मॉनिटर आहेत, हे सर्व मॉनिटर नर्सिंग स्टेशनच्या संगणक प्रणालीस वायरलेस पध्दीतीने जोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक रुग्णाची शारिरीक स्थितीबाबतची माहिती सतत अद्यावत होत असते. त्यानुसार संबंधीत रुग्णांवर उपचार करण्यात येत असतात. यासाठी २.९४ कोटी रुपये जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आले होते. तसेच रुग्णालयातील कान, नाक व घसा शास्त्र विभाग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग, बधिरीकरणशास्त्र विभाग, तसेच जीवरसायनशास्त्र विभाग या विभागांतील आवश्यक असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे सुध्दा आज लोकार्पण करण्यात आले.
कॉकलर इंप्लांट सर्जरी पण होणार
कार्ल झेसिस या जर्मनस्थित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त सर्वोत्तम प्रतिचा एक्सटेरो हा ऑपेरेटिंग मायक्रोस्कोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे बसविण्यात आलेला आहे. कानाच्या पडद्याला छिद्र असणे किंवा कानातील हाड सडले असल्यास त्याचा रुग्णाच्या जिवीतास धोका निर्माण होतो. तो दूर करण्यासाठी या ऑपेरेटिंग मायक्रोस्कोप च्या सहाय्याने आवश्यक ती शस्त्रक्रिया करण्यात येऊन रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी मदत होते. ज्या मुलांना जन्मतः ऐकु येत नाही व त्यांना बोलताही येत नाही, अशा मुलांना दिव्यांग म्हणून पुढील आयुष्य जगावे लागते. यावर कॉकलर रोपण ची शस्त्रक्रिया कार्ल झेसिस च्या दुर्बिणीद्वारे करता येणे आता शक्य होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.