लाडकी बहिण’ नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, १२ वी पास तरुणांना दर महीना ६००० रूपये
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेतंर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. १ जुलै २०२४ पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला गर्दी करत आहे. या योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांनी खास योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेनंतर लाडक्या भावांसाठीही खास योजनेची घोषणा केली आहे. जो तरुण १२ वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला १० हजार रुपये महिन्याला दिले जातील.
हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल. त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना ०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड २) मतदार ओळखपत्र ३) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४) जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.