अमरावती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावर २०-२५ कार्यकर्त्यांकडून हल्ला
योगेश पांडे/वार्ताहर
अमरावती – अमरावती शहराच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. रविवारच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीच्या दोन वाजताच्या सुमारास दर्यापूर ते अमरावती मार्गावरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ २० ते २५ अज्ञात व्यक्तीकडून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाचे अमरावती शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि त्यांच्या मुलगा राम पडोळे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे बोलल्या जात आहे. यात गोपाल अरबट जखमी झाले आहे. या हल्ल्यामुळे अमरावती जिल्ह्यात शिंदे गटात राजकीय भूकंप झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही जिल्हाप्रमुखांचा हा वाद विकोपाला गेल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे अमरावती शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि त्यांच्या मुलगा राम पडोळे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांनी ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. पक्षातील मतभेदामुळे हा हल्ला झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. या प्रकरणी पोलिसांची उशिरा मदत मिळाल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्याचा गंभीर आरोप जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केला आहे. तर उशिरापर्यंत गुन्हा दाखल न करण्यात आल्याने जिल्हाप्रमुख आणि ठाणेदार यांच्यामध्ये काहीकाळ तू-तू मैं-मैं झाल्याचे देखील बघायला मिळाले आहे.
तर या प्रकरणी दर्यापूर पोलीसांनी अमरावती शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास सध्या करत आहे. मात्र या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन जिल्हाप्रमुखांमधील वाद विकोपाला गेल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.