• Mon. Oct 14th, 2024

महाराष्ट्र सरकारची उचलेगिरी, केंद्र सरकारकडून महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा, शेतकऱ्यांसाठीही कोणतीही तरतूद केली नाही

ByPolitical Views

Jul 23, 2024



महाराष्ट्र सरकारची उचलेगिरी, केंद्र सरकारकडून महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा, शेतकऱ्यांसाठीही कोणतीही तरतूद केली नाही

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून भरीव असे काहीच मिळाले नाही. काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्प दिसून आली, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टिका केली आहे. एकीकडे राज्य सरकारमधील नेते व मंत्री एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पावर आनंद व्यक्त करत असून हे सर्वसामान्य व शेतकऱ्यांचं बजेट असल्याचं सांगत आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांकडून या बजेटवरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. बजेटवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष कोणतीही तरतूद केली नाही. महाराष्ट्रातील कापूस, संत्रा, धान, कांदा, सोयाबिन, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला विसर पडल्याचे आता लपून राहिले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे केंद्राचे गोडवे गाणाऱ्या महायुतीने महाराष्ट्रासाठी काय आणले याचा हिशेब जनतेला द्यावा. विकास कामाच्या नावाखाली दिल्लीच्या चकरा मारणाऱ्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी निधीबाबत चर्चा केल्या की तिथे जाऊन राजकीय फायद्याची गणितं मांडली असा प्रश्न या अर्थसंकल्पामुळे पडतो. त्यामुळे महायुती सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान कितीवेळा तुडविणार याचा जाब जनताच विचारेल. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात बेरोजगार तरूणांसाठी पहली नोकरी पक्की ही योजना आणली होती. या योजनेनुसार इंटर्नशिप देण्याचं आश्वासन आम्ही दिले होते. आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हीच घोषणा केली आहे. एकीकडे विरोधकांवर रेवडी संस्कृती म्हणून टीका करायची आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या योजनांची उचलेगिरी या अर्थसंकल्पात केली आहे. केंद्र सरकारला मतांसाठी आणि टॅक्ससाठी महाराष्ट्राची आठवण होते. परंतु महाराष्ट्राला निधी देताना केंद्र सरकार हात आखडता घेते.

केंद्र सरकार अस्थिर आहे. बिहारच्या जेडीयु आणि आंध्रच्या टीडीपी पक्षाच्या टेकूवर केंद्र सरकार उभे असल्याने बिहार आणि आंध्र प्रदेशवर निधीची खैरात केली आहे. देशातील सर्व राज्यांना न्याय देण्याची वृत्ती या सरकारची नाही. राजकीय फायदा असणाऱ्या राज्यातच निधी देणारं हे सरकार आहे. त्यामुळे मंगळवारी सादर झालेला अर्थसंकल्प भारतासाठी नाही ठराविक राज्यासाठी आहे अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. महाराष्ट्राला ही वागणूक का? महाराष्ट्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर राखत तुमच्या संविधान विरोधी सत्तेला आळा घातला म्हणून? की महाराष्ट्राची जनता अजूनही स्वाभिमानी आहे म्हणून? की महाराष्ट्रावर ह्यांचा जूना आकस आहे म्हणून? बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांचा वाटा नक्की द्या, पण महाराष्ट्र सर्वात मोठा करदाता असूनही भाजपाचा महाराष्ट्रावर एवढा राग कशासाठी?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी बजेटनंतर विचारला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें