• Thu. Oct 10th, 2024

लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विधानसभेसाठी एकला चलो चा नारा

ByPolitical Views

Jul 25, 2024



लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विधानसभेसाठी एकला चलो चा नारा

विधानसभेला २२५-२५० जागा लढणार आणि सत्तेत जाणार; राज ठाकरे १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभेसाठी एकला चलो रेचा नारा दिला आहे. कोणाशी युती होईल, किती जागा मिळतील याचा विचार करु नका. आपण विधानसभेच्या सव्वा दोनशे ते अडीचशे जागांवर लढवणार आहोत, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. ते मुंबईतील रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांना संबोधित करत होते. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाकडून राज्यात सर्व्हेक्षण सुरु आहे. मध्यंतरी ४-५ जणांचं पथक जिल्हा, तालुका पातळीवर जाऊन आलं. त्यांनी प्रत्येक मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. लोकांशी, पत्रकारांशी बोलून त्यांनी तपशील गोळा केलेला आहे. आता लवकरच ते पुन्हा सर्वेक्षणासाठी जातील. तेव्हा ते पदाधिकाऱ्यांना भेटतील. त्यांना अचूक माहिती द्या, अशा सूचना राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच विधानसभेसाठी तिकीट दिलं जाईल. तिकीट मिळालं म्हणजे मी पैसे काढायला मोकळा असा विचार करणाऱ्यांना तिकीट मिळणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर मला माझ्या पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवायचं आहे आणि काहीही करुन ते मी करणारच, असा निर्धार राज यांनी व्यक्त केला. मी सत्तेत बसण्याची भाषा केल्यावर काही जण हसतील, त्यांना हसू द्या. पण यंदाच्या निवडणुकीनंतर ही गोष्ट घडणार आहे. आपण सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवणार आहोत. त्यामुळे युतीत किती जागा मिळतील, कोणत्या जागा मिळतील, असे प्रश्न मनातून काढून टाका, असं राज ठाकरे म्हणाले. आपण १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणादेखील राज यांनी केली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें