विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत ११ आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व ११ आमदारांचा शपथविधी सोहळा रविवारी संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार निवडणूक आले होते. तर शेकपाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. शपथ घेणाऱ्या आमदारांमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे,योगेश टिळेकर,अमित गोरखे,परिणय फुके, सदाभाऊ खोत शिंदे गटाच्या भावना गवळी,कृपाल तुमाने, अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकर तर कांग्रेस पक्षाच्या प्रज्ञा सातव आणि उद्धव गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत महायुतीने ९ जागा जिंक्ल्या तर महाविकास आघाडीने २ जागा जिंकल्या होत्या, १२ उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची ८ मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आला होता.