• Thu. Oct 10th, 2024

शिंदे गटाच्या खासदाराची खासदारकी अणचणीत?

ByPolitical Views

Jul 29, 2024



शिंदे गटाच्या खासदाराची खासदारकी अणचणीत?

अमोल कीर्तिकरांच्या दाव्यावर रविंद्र वायकर यांना उच्च न्यायालयाचे समन्स

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला उद्धव ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेची उच्च न्यायालयाने सोमवारी दखल घेतली आणि वायकर यांच्यासह अन्य उमेदवार व प्रतिवाद्यांना समन्स बजावून २ सप्टेंबरपर्यंत कीर्तीकर यांनी केलेल्या आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. वायकर यांची खासदारकी रद्द करण्याची आणि या मतदारसंघातून आपल्याला निर्वाचित उमेदवार घोषित करण्याची मागणी कीर्तीकर यांनी याचिकेद्वारे केली आहे. कीर्तीकर यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.

दरम्यान, मतमोजणीच्या दिवशीच मतांमध्ये तफावत आढळून आल्याने पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर त्रुटी राहिल्या. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला, असा दावा कीर्तीकर यांनी केला आहे. मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याने, ३३३ बनावट मतदारांनी केलेल्या मतदानाचाही निकालावर परिणाम झाला. निवडणूक अधिकाऱ्याने मनमानीपणे मतमोजणी करण्यात घाई केल्याचा दावाही कीर्तीकर यांनी याचिकेत केला आहे. तसेच, याचिकेवरील सुनावणीच्यावेळी या मतदारसंघातील संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे चित्रिकरण सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला होता. वायकर यांना ४,५२,६४४ तर कीर्तिकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली होती. बऱ्याच गोंधळानंतर वायकर यांना विजयी उमेदवार घोषित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, वायकर यांच्या खासदारकीविरोधात करण्यात आलेली ही दुसरी याचिका आहे. गेल्याच महिन्यात याच मतदारसंघातील हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी वायकर यांच्या खासदारकीला आव्हान दिले होते.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें