वरळीतील जांबोरी मैदानातील बांधकामावरून ठाकरे गट व मनसेत राडा, दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत यांच्यात राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. वरळीतील जांबोरी मैदानात सुरु असलेल्या बांधकामावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले. आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरुन जांबोरी मैदानात बेकायदेशीर काम केल्याचा आरोप मनसेने केला आहे. यावेळी मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे घटनास्थळी गेले असताना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरु झाली. या बाचाबाचीनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीही केल्याची माहिती आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी वरळी विधानसभेतील वातावरण तापल्याचं चित्र आहे. वरळीतील जांबोरी मैदानात एक बांधकाम सुरु आहे. मात्र हे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप मनसेचा आहे. या आरोपामुळे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे घटनास्थळी गेले. त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही गटात धक्काबुक्की झाली.
वरळी विधानसभा मतदारसंघात संदीप देशपांडे यांचं नाव मनसेकडून चर्चेत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे या मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. मात्र मनसेकडून आता या मतदारसंघात जोरदार तयारी करण्यात येत आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना या मतदारसंघातून रणांगणात उतरवण्याची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मनसेचे नेते वरळी मतदारसंघात सक्रिय झाल्याचं दिसतंय. त्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. या धक्काबुक्कीचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वरळी मतदारसंघातील राजकारण तापल्याचं म्हटलं जातंय.