अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरुन महायुतीत तणाव; शिंदे गटानंतर भाजपनेही केला दावा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महायुतीतील मित्र पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरुन जुंपण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभेत भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि आमदार अमित साटम यांनी मोठी घोषणा केली. आमदार अमित साटम यांच्या या घोषणेमुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडू शकते. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांचा पक्षप्रवेश करून अंधेरी पूर्व विधानसभेवर दावा केला. याला २४ तास उलटत नाही तोच अमित साटम यांनी महायुतीत अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजप कमळाच्या चिन्हावर लढणार आणि जिंकणार अशी घोषणा केली. मुरजी पटेल भाजपचे उमेदवार असतील. त्यांच्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून अमित साटम यांनी केलेल्या दाव्यामुळे शिवसेना शिंदे गट व भाजप या दोन्ही पक्षात उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडू शकते.
मुंबईत अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तणाव दिसून येतोय. अंधेरी पूर्व विधानसभामध्ये सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा रमेश लटके आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभेची जागा लढवण्याची तयारी सुरू झालीये. यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व साठी निरीक्षक देखील नेमण्यात आलाय. मंगळवारी अंधेरीतील समाजसेविका स्वीकृती शर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. अंधेरी पूर्व मधून स्वीकृती शर्मा या विधानसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. स्वीकृती शर्मा या वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी आहेत. स्वीकृती शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झालीय.