खासदार नरेश म्हस्केंना उच्च न्यायालयाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे नेते राजेंद्र विचारे यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने गुरुवारी शिंदे गटाचे नेते व ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या २२ उमेदवारांना गुरुवारी समन्स बजावले. नरेश म्हस्के यांची निवडणूक रद्दबातल ठरवावी आणि आपल्याला विजयी उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी मागणी राजन विचारे यांनी याचिकेद्वारे केली आहे.
म्हस्के यांच्या उमेदवारी अर्जात त्यांना कधीही दोषी ठरवलेले नाही, असा दावा केला होता. प्रत्यक्षात दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. तसेच ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचे अपीलही फेटाळले होते, असे विचारे यांच्या वतीने वरिष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले. आपल्यावर गुन्हेगारी खटले दाखल आहेत की नाहीत हे मतदारांना कळावे यासाठी उमेदवाराने उमेदवारी अर्जात त्याचा खुलासा करणे अनिवार्य आहे. परंतु म्हस्के यांनी गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवली, असा दावा खंबाटा यांनी केला.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली, महायुतीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ठाण्यात याउलट चित्र होतं. नरेश मस्के यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली तर शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात होते. नरेश मस्के यांनी जवळपास दोन लाख मतांनी विचारे यांचा पराभव केला.