राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी; आमदार अपात्रतेबद्दलची सुनावणी दोन आठवड्या नंतर
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची अपडेट दिली आहे. आमदार अपात्रतेबद्दलची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायलयाने या महिन्यात दोन्ही प्रकरणी सुनावणी होणार नाही, असे आदेश दिले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यातच पुन्हा नव्याने याप्रकरणाची सुनावणी पार पडेल, असे सांगितले आहे.
आमदार अपात्रता प्रकरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता शिवसेनेने केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वकिलांना कोर्टाने कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ दिला होता. मात्र अजित पवार गटाकडून अद्याप त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यातच अजित पवार गटाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालवधी वाढवून मागितला आहे. तसेच त्यांच्या वकिलांनी ही सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती केली होती. ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी २ आठवड्यानी पार पडणार आहे.