शिवसेना (उबाठा) राबवलेल्या भगव्या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी, ठाण्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या ठाकरे गटाने आता विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून ठाकरे गटाने ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरूवात केली आहे. तसेच या सप्ताहाच्या माध्यमातून पक्ष सदस्य नोंदणी करण्याबरोबरच पक्षाचे मशाल चिन्ह घरोघरी पोहचविण्याची मोहीम हाती घेतल्याचे दिसून येत आहे. या भगव्या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी,उद्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगला होता. मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जातात. यामुळेच शिवसेनेतील फुटीचे केंद्रबिंदू म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. यामुळे या मतदार संघातील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून तो कुणाच्या ताब्यात राहणार हे ठरविणारी ही निवडणूक होती. या निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव करत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे हे त्यांच्याच शिवसेनेचे असल्याचे स्पष्ट केले होते. या निवडणुकीतील पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला असून त्यांनी या पराभवाचा बदला विधानसभा निवडणुकीत घेण्याचा चंग बांधला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चेबांधणी करत निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून ठाकरे गटाने ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरूवात केली आहे.
ठाकरे गटाकडून राज्यभरात भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ४ ऑगस्टपासून सुरू झालेला हा सप्ताह ११ आगॅस्ट रोजी संपणार आहे. या सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये ज्येष्ठांचा सन्मान सोहळा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, स्वस्त दरात कांद्याची विक्री, आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. याच उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरूवात केली आहे. तसेच घरोघरी पोहचून कार्यकर्ते मशाल चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सप्ताहाची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी यासाठी मतदारसंघ निहाय्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भगव्या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यात येणार आहेत. सायंकाळी ६ वाजता राम गणेश गडकरी रंगायतनात त्यांची सभा होणार आहे.