ठाण्यातील शिवसेनेची वाघीण अनिता बिर्जेनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात केला प्रवेश
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या सहकारी आणि ठाकरे गटात उपनेते पदी असलेल्या अनिता बिर्जे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. शनिवारी उद्धव ठाकरे हे भगवा सप्ताह निमित्ताने ठाण्यात होते. त्याचवेळी दुसरीकडे अनिता बिर्जे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेंभीनाका येथे त्यांचा पक्ष प्रवेश झाला. आनंद दिघे यांच्यावर आधारित ‘धर्मवीर -मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील त्यांचे पात्र गाजले होते. आनंद दिघे यांच्या हयातीत बिर्जे यांनी शिवसेनेच्या महिला आघाडीची धुरा सांभाळली होती. त्यामुळे आनंद दिघे हे त्यांना शिवसेनेच्या वाघीण म्हणत होते. शिवसेनेच्या फुटीनंतर अनिता बिर्जे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची थेट उपनेते पदी निवड केली होती. आनंद दिघे हयात असताना बिर्जे या शिवसेनेच्या महिला आघाडीची धुरा सांभाळली होती. दोन वर्षांपूर्वी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातही अनिता बिर्जे यांचे पक्षासाठीचे कार्य ठळकपणे दाखविण्यात आले होते. या चित्रपटात त्यांच्याविषयी एक संदर्भ दाखविण्यात आला आहे. दंगली दरम्यान, त्यांच्या घराला आग लावण्यात आली होती. त्यावेळी घरामध्ये त्यांचा मुलगा आणि त्या होत्या. आनंद दिघे हे स्वत: तेथे जातात आणि दंगलखोरांना पिटाळून लावतात. असे या चित्रपटात दाखविले होते. तसेच दिघे यांच्या काळात ठाण्यातील डान्स बार विरोधातील आंदोलनातही त्या होत्या. शिवसेनेचे नगरसेवक खोपकर यांच्या हत्येनंतर आनंद दिघे यांना अटक झाली होती. त्यावेळी ठाणे बंद पुकारण्यात आला होता. दिघे यांची सुटका व्हावी यासाठी शाळकरी मुले, महिला यांचे मोर्चे बिर्जे यांच्या नेतृत्त्वाखाली काढल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. दिघे हे त्यांना नेहमी शिवसेनेच्या वाघीण असे संबोधत असल्याचेही या चित्रपटात पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. परंतु अनिता बिर्जे या उद्धव ठाकरे यांच्या सोबतच होत्या. अखेर शनिवारी उद्धव ठाकरे ठाण्यात असताना दुसरीकडे बिर्जे यांचा आनंद दिघे यांच्या आनंद मठात शिंदे गटात प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे हेच दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बिर्जे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दिवंगत आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. बिर्जे यांच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल अशी अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.