विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांचे धक्कातंत्र; पवारांच्या गळाला बडे मोहरे, भाजपचै समरजीत घाटगे व हर्षवर्धन पाटील हाती घेणार तुतारी ?
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार एक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील बडे राजकीय मोहरे शरद पवारांच्या गळाला लागल्याचं चित्र आहे. शरद पवारांनी आपल्या या मिशनला कोल्हापूरमधून सुरूवात केलीय. कागलचे भाजप नेते समरजीत घाटगे पुढल्या काही दिवसांमध्ये शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही पुण्यात शरद पवार यांची भेट घेतलीय. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झालीय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे विधानसभेला तुतारी हाती घेणार का अशी चर्चा सुरू झालीय.. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी ही चर्चा फेटाळलीय. दुसरीकडे अहमदनगरच्या कोपरगावातील राजकीय प्रस्थ विवेक कोल्हे यांनीही शरद पवारांची भेट घेतलीय. एवढंच नाही तर शरद पवारांनी स्वत: विवेक कोल्हेंना हाक मारुन गाडीत बसवून घेतलं. त्यामुळे कोल्हापूरनंतर शरद पवार पुढचा धक्का अहमदनगरमधून देणार का याची चर्चा सुरु झालीय. विवेक यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे या कोपरगावातू यापूर्वी आमदार राहिलेत. मात्र २०१९ मध्ये आशुतोष काळेंनी त्यांचा पराभव केला. आशुतोष काळे हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेत. विवेक कोल्हे यांना भाजपकडून तिकीट मिळणं कठिण आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं बोललं जातंय.
दरम्यान साताऱ्यातील मतन भोसले यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतलीय. भोसले हे वाई विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे मतन भोसलेही तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या तोंडावर शरद पवार मिशन मोडमध्ये आलेत..राज्यातील बडे राजकीय मोहरे पवारांच्या गळाला लागलेत. ज्या पद्धतीने पवारांचे डाव पडताहेत आणि जी नावं समोर येताहेत त्यावरून पवारांच्या खेळीचा राजकीय अंदाज पाहायला मिळतोय. त्यामुळे निवडणुका जशा जवळ येतील तसे पवारांकडून अजुनही काही अचंबित करणारे धक्के मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.