खड्डे बुजवले नाही तर त्याच खड्ड्यात केडीएमसी अधिकाऱ्यांना उभे करू – राजू पाटील
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसे आमदार यांचा केडीएमसी अधिकाऱ्यांना इशारा
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण-डोंबिवलीत खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. खड्ड्यांवरून सत्ताधारी पक्षाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठोपाठ आता मनसे आमदार राजू पाटील देखील आक्रमक झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरले नाहीतर अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात उभे करु असा इशारा आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिला आहे.
आमदार पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी ठाणे नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त देखील उपस्थित होते .यावेळी खड्डे भरण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र इतक्या वर्षांचा अनुभव पाहता, अधिकाऱ्यांना आंदोलन करुन दट्ट्या दाखवल्याशिवाय काम करता येत नाहीत. मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रभागातले खड्ड्यांचे फोटो पाठवण्यास सांगितले आहे. दोन दिवसात खड्डे भरले नाही तर महापालिका अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात उभे करू, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवरुन संताप व्यक्त केला होता. विश्वनाथ भोईर यांनी म्हटलं की, “रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसी आयुक्तांना सूचना केली होती. मात्र प्रशासनाने खड्डे भरले नाही असे दिसत आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे. परंतु आता गणेशोत्सव सुरू झाला आहे. खड्ड्यांमुळे काही घटना घडली. शहरात शांतता आहे ती बिघडेल. घटनेमुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर यासाठी केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील.”