राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल
तर हे देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान – अनिल देशमुख
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयकडून त्यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता. त्यानंतर, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देखमुख यांनी ट्विट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. तसेच, राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन केले जात आहे असे म्हंटले आहे.
प्रकरण नेमकं काय आहे…
या सगळ्या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया देशमुख यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे, ”आज माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता -न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे,” असे म्हणत अनिल देशमुख यांनी या घटनेनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, धन्यवाद देवेंद्रजी म्हणत देवेंद्र फडणवीसांचे आभारही मानले आहेत.