अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला १५ कोटी रूपयांचा २० किलो सोन्याचा मुकूट अर्पण
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ज्यांच्या आगमनाची महाराष्ट्रातील गणेशभक्ताना उत्सुकता असते, त्या मुंबईतील लालबागच्या राजाचे आगमन आज झाले. मुंबईची शान म्हणत लागबागच्या राजाची पहिली झलक गुरुवारी मुंबईकरांनी पाहिली. मयूरासनावर विराजमान यंदाचा लालबागचा राजा पाहून भाविकांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया.. लागबागचा राजा… मोरया.. अशा घोषणांनी लालबाग परिसर दणाणून गेला होता. या गणपती बाप्पांचे लाईव्ह दर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भाविकांना घेतले. आपल्या मोबाईलमध्ये बाप्पांचे रुप साठवण्यासाठीही मंडळ ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे यंदाच्या लालबागच्या राजाचा मुकूट सोनेरी असून देशातील गर्भश्रीमंत अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने ही गणेशभक्ती अंबानी कुटुंबीयांनी दाखवल्याचं बोललं जात आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी करतात. अनेक सेलिब्रिटी देखील लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी हजेरी लावतात. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातील व्हीव्हीआयपी देखील उपस्थित राहतात. देशासह जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मोठ्या दिमाखात स्थान मिळवणारं अंबानी कुटुंब देखील दरवर्षी मुंबईतील लालबाग राजाच्या दर्शनासाठी आवर्जुन उपस्थिती लावतं. अशातच यंदाच्या वर्षी अंबानी कुटुंबातील एका सदस्याची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील एका मानाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील एका मानाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साधारणतः महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर, आज लालबागच्या राजाची झलक पाहायला मिळाली. त्यामध्ये, मयूरासनावर विराजित आणि सोन्याचं मुकूट परिधान केलेला राजा पाहून भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं.
मयूरासनावर विराजमान यंदाचा लालबागचा राजाअसून राजाने परिधान केलेला सोन्याचा मुकूट हा अंबानी कुटुंबीयांकडून अर्पण करण्यात आला आहे. हा सोन्याचा मुकूट वीस किलो सोन्याचा आहे. आज मुंबईच्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन झालं, लालबागच्या राजाची मनमोहक अशी १४ फुटाची बाप्पाची मूर्ती यंदाच्या वर्षी मयूरासनावर विराजमान आहे. लालबागच्या राजाला यंदा मयूर महल केला असून मंडळाचे हे ९१ वे वर्ष आहे. विशेष म्हणजे लालबागच्या राजावर यावर्षी वीस किलो सोन्याचा मुकुट पाहायला मिळतोय. ज्याची किंमत तब्बल १५ कोटी रुपये आहे, त्यामुळे बाप्पांच्या मूर्तीमध्ये अधिकच सुंदरता दिसून येते.