किरीट सोमय्यानी वाढवली भाजपची चिंता? लेटरबॉम्ब टाकून पहिल्यांदाच पक्षाच्या निर्णयावर दर्शावला संताप
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – एकीकडे जागावाटप आणि एकमेकांवर टीका-टिप्पणी केल्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे तर अशातच आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या कमालीचे नाराज झाले आहेत. किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पण, ‘मला न विचारता नियुक्ती का केली,’ असं म्हणत सोमय्यांनी आपल्याच पक्षाचा निर्णय नाकारला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण, भाजपच्या या घोषणेमुळे सोमय्या कमालीचे नाराज झाले असून रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे.
आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी,’ असं म्हणत सोमय्यांनी आपली नाराजी पत्रातून बोलून दाखवली आहे. तसंच, ‘१८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजप-शिवसेनेची ब्ल्यू सी हॉटेल वरळी इथं संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषदेतून जाण्यास सांगितलं होतं. तेव्हापासून मी भाजपचा एक सामान्य सदस्य, कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मधल्या काळात मी ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी स्वीकारली होती. माझ्यावर तीनवेळा जीवघेणे हल्लेही झाले. तरीही मी ही जबाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे,’ असं म्हणत सोमय्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. मी विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतोय आणि करत राहणार आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये,’ असं म्हणत सोमय्यांनी विनंती सुद्धा केली आहे.