एकनाथ शिंदे याचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात यावे, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली इच्छा
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन करावे, अशी इच्छा शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत हे विधान केले. महाराष्ट्रात सध्या जे सरकार आहे ते परत यावे, असं त्यांनी म्हटलं. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पुढे म्हटलं की, “मला महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल फारशी माहिती नाही, मी निवडणूक पंडितही नाही. मला निवडणुकीच्या राजकारणाचीही फारशी माहिती नाही. पण, सरकार तिथे काम करत आहे. या सरकारने गायीला मातेचा दर्जा दिला आहे. जर हे सरकार पुन्हा सत्तेत आलं तर एक आदर्श व्यवस्था देखील केली जाईल. जी संपूर्ण देशाला आणि संपूर्ण जगाला मार्ग दाखवेल.
उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी इतर कुणावरही बोलणार नाही. पण देशाच्या स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही एकनाथ शिंदे यांनी जे काम केले आहे, ते कोणत्याही इतर मुख्यमंत्र्याने केले नाही. संत समाजाच्या राजकारणावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, “आम्ही कोणती निवडणूक लढवत आहोत? की मुख्यमंत्रिपदावर बसलो आहोत? कोणाला मत द्यायचं आणि कोणाला मत द्यायचं नाही यावर आमची मते मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. एखाद्या नेत्याने चांगले काम केले तर त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. गाईला मातेच्या दर्जा देऊन एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण भारतातील करोडो हिंदूंचं मन जिंकलं आहे. कुंभमेळ्यात मुस्लिमांच्या ‘नो एंट्री’वर शंकराचार्य म्हणाले, “कोण मुस्लिम आणि कोण हिंदू हे ओळखणे आता कठीण झाले आहे. आता लोक धर्मांतरही करतात, पण नाव बदलत नाहीत. कुंभमेळा हा धार्मिक सण आहे. यात गंगास्नानाचे पुण्य आहे आणि पापांचा नाश होतो. इस्लाममध्ये असे काही नाही आणि म्हणून त्यांच्या कुंभात येण्यात काही अर्थ नाही.”