शरद पवारांशी वैचारिक मतभेद आहेत तर आता स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका – सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाची अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकार; शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ न वापरण्याची सूचना, पुढची सुनावणी १९ नोव्हेंबरला
योगेश पांडे/वार्ताहर
नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ न वापरण्याची सूचना केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने ही सूचना केली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. न्यायालयाने आपल्या आधीच्या आदेशाची आठवण करुन देत ही सूचना केली आहे. दोन्ही बाजूंनी निवडणुकीपूर्वी त्यांची वेगळी ओळख कायम ठेवण्यास कोर्टाने सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या पायांवर उभं राहण्यास शिका अशा शब्दांत सुनावलं आहे. तसंच आपल्या पक्षाची वेगळी ओळख जपा असंही सांगितलं आहे. “शरद पवारांशी वैचारिक मतभेद आहेत तर आता स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका. एकदा तुम्ही शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर तुम्ही त्यांचे नाव, फोटो किंवा व्हिडिओ वापरू नये,” असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.
१९ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, मतदारांच्या हुशारीवर पूर्ण विश्वास आहे ज्यांना कोणाला मतदान करायचं हे माहिती आहे. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. मागील सुनावणीवेळी अजित पवार यांना वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यास सांगण्यात आलं होतं. १३ तारखेला त्यांना शपथपत्र सादर करायचं आहे असं सांगण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी आपल्यावर लक्ष केंद्रीत करावं असा सल्ला दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बुधवारी न्यायालयात सांगितले की, ज्येष्ठ राजकारणी पुतणे अजूनही काकांचा वापर करत आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही, असा आरोपही त्यांनी केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट कौटुंबिक मतभेदाबद्दल मतदारांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे का? अशी विचारणा यावेळी कोर्टाने केली.
यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या निवडणूक जाहिरातींमध्ये डिस्क्लेमर जोडण्याचे निर्देश दिले होते की पक्षाद्वारे वापरले जाणारे ‘घड्याळ’ चिन्ह हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत पक्षाबाबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या निकालाच्या अधीन आहे. अजित पवार यांच्या पक्षाने न्यायालयाला आश्वासन दिलं की त्यांनी ज्या वृत्तपत्रांमध्ये चिन्ह प्रदर्शित केले आहे त्या वृत्तपत्रांमध्ये मराठीत डिस्क्लेमर प्रकाशित केले जाईल.