ऐन निवडणूक प्रचारात अजित पवारांना दणका; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नव्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना, निवडणूक आयोगाकडून अजित पवार यांच्या जाहिरातीवर आक्षेप घेण्यात आलाय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रचारासाठी नवीन टीव्ही जाहिरात बनवण्यात आलीय. ‘आता घड्याळाचं बटन दाबणार आणि सर्वांना सांगणार’, अशा आशयाची ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये दाखविण्यात आलेल्या एका दृष्यावर राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून, या जाहिरातीच्या मंजुरीसाठी त्यातून ठराविक भाग काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यस्तरीय प्रामाणिकरण समितीकडं निवडणूक प्रचारासाठी त्यांच्या टीव्ही जाहिरातीच्या पूर्व प्रामाणिकरणासाठी अर्ज केला होता. परंतु, या जाहिरातीच्या काही भागावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला. निवडणूक आयोगानं या जाहिरातीतील एका संवादाला ‘पत्नीकडून नवऱ्याला दिलेली धमकी’ असं म्हटलंय. कुठल्याही विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळं कोणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. याकरता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी यातील काही विशिष्ट भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातीमध्ये एक पत्नी आपल्या पतीला महायुती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या योजनांची माहिती देते. त्यानंतर आता तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या. नाहीतर आज रात्री मी तुम्हाला जेवायला देणार नाही, असं विनोदाने म्हणते. तर निवडणूक आयोगानं याच दृष्यावर आक्षेप घेतला आहे. एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळं कोणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. याकरता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून आज सोमवारी १८ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता निवडणूक प्रचाराची सांगता होणार आहे. राज्यात झालेल्या पक्षांतराच्या नाट्यमय घडामोडीनंतर लोकसभेनंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झालीय. तर आता असली-नकलीचा फैसला सुद्धा या निवडणुकीत होणार असल्यानं प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे.