पंतप्रधान नरेंद्र मोदीनां राहुल गांधीचं प्रतिउत्तर?
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट; आदित्य अन् उद्धव ठाकरेंचा केला उल्लेख
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जोरदार प्रचार सुरु असून प्रचारासाठी शेवटचे अगदी काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढत होत असून दिल्लीतील नेते देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. प्रियांका गांधी व राहुल गांधी हे देखील सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार प्रचार करत आहेत. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलावे अशी आरोळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोकली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोस्ट केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रविवारी १२ वी पुण्यतिथी होती . मुंबईतल्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळी जाऊन उद्धव ठाकरेंनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं. तसंच महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत पोस्ट लिहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा वीर सावरकर यांच्याबाबत दोन शब्द बोलून दाखवा असे आव्हान दिले होते. यावर आता राहुल गांधी यांच्या पोस्टमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सर्वांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच आदरांजली वाहिली आहे. यामध्ये आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील पोस्ट लिहित बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. “बाळासाहेब ठाकरे यांची १२ वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांची आठवण येते आहे. माझे विचार आणि संवेदना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच संपूर्ण शिवसेना कुटुंबासह आहेत.” अशी सोशल मीडिया पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.