समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. समाजवादी पक्षाचे ताकदवान नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहे. अबू आझमी यांच्याकडूनही त्यांच्या मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात प्रचार सुरु होता. विशेष म्हणजे या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. या मतदारसंघात मुस्लिमबहुल लोकसंख्या आहे. अबू आझमी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून गेल्या तीनही निवडणुकीत जिंकून आले असले तरी या निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे. अबू आझमी यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे देखील मानखुर्द-शिवाजीनगर येथून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे अबू आझमी यांच्यासमोर कडवं आव्हान आहे. असं असताना त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून आझमी यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी यांना हृदय विकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कार्यकर्त्याकंडून माहिती देण्यात आली आहे. “अबू आझमी यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र आता ते घरी परतले आहेत. अबू आझमी सध्या ठीक आहे”, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.