थेट मतदानाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा दिलीप लांडे साठी रोड शो; एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाकडे तक्रार
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ नुसार एफआयआर दाखल करण्याचे निर्देश साकीनाका पोलीस स्टेशनला द्यावेत, अशी लेखी तक्रार मविआचे उमेदवार नसीम खान यांचे मुख्य पोलींग एजंट गणेश चव्हाण यांनी केली आहे. निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाच्या दिवसापूर्वी ४८ तास इतर मतदार संघातील उमेदवार किंवा कोणतेही राजकीय नेते यांना स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर मतदार संघात प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी मतदान सुरु असताना म्हणजे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास काजुपाडा घास कंपाऊंड ते सेंट ज्युड हायस्कूल भागात रोड शो काढून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. रोड शो काढलेल्या भागात अनेक मतदान केंद्रे आहेत. हा आदर्श आचार संहितेचा उघड भंग असून ही अनधिकृत उपस्थिती गंभीर चिंता निर्माण करणारी तसेच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीला बाधा पोहचवणारी आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष बघायला मिळाला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात सभा घेतल्या. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यभरात सभा घेतल्या. या निवडणुकीत शरद पवार अतिशय आक्रमक बघायला मिळाले. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी संपूर्ण राज्य पिंजून काढत झुंजारपणे प्रचार केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महायुती, महाविकास आघाडी, मनसे आणि अन्य पक्षाच्या सभा, मेळावे, रॅली काढून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. काल राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.