• Thu. Dec 5th, 2024

आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, तर भास्कर जाधवांकडे शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी

ByPolitical Views

Nov 25, 2024



आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, तर भास्कर जाधवांकडे शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळेच, निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तसेच, हा निकाल महाराष्ट्रातील जनतेला मान्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित करत ईव्हीएमच्या घोळावरुन संशयही व्यक्त केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा निकाल अंतिम मानून आता पुढील कामकाज करावे लागणार आहे. त्यानुसार, सर्वच पक्षांच्या विजयी आमदारांची बैठक मुंबईत होत असून गटनेता व सभागृह नेत्यांची निवड केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाने रविवारी सर्वच आमदारांची बैठक घेऊन मुख्य नेते व गटनेते म्हणून एकनात शिंदे यांची निवड केली आहे. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षांच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आलीय. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृह नेता बनले आहेत. तर,भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आलीय. उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारासोबत झालेल्या सोमवारच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा, तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतील निर्णय होतील.

राज्यातील विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात भाजप महायुतील तब्बल २३६ जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने तब्बल १३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना शिंदे गटानेही तब्बल ५७ जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. तर, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे २० आमदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर १६ जागांसह काँग्रेस असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १० जागांवर यश मिळालं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें