• Thu. Dec 5th, 2024

राज्यातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

ByPolitical Views

Nov 27, 2024



राज्यातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

योगेश पांडे/वार्ताहर 

 

नाशिक – राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली आहे.

सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत. सीमा हिरे यांना १ लाख ४१ हजार ७२५ मते मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर यांना ७३ हजार ६५१ मते मिळाली आहेत. तर मनसेच्या उमेदवाराला ४६ हजार ६४९ मते मिळाली आहेत.

ईव्हीएम मशीन मतमोजणीवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी संशय घेतला आहे. त्यामुळं औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत. नियमानुसार पाच टक्के ईव्हीएमची फेर मतमोजणी होऊ शकते त्यासाठी शुल्क भरावा लागतो. ही सगळी प्रक्रिया पार पडून फेर मतमोजणीची मागणी करणार असल्याचं या उमेदवारांचे म्हणणं आहे. मातोश्रीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना दिल्याचं उमेदवारांनी सांगितले आहे. परळी मतदारसंघामध्ये १४० ते १५० बूथवरती मृत लोकांचं मतदान झालं असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहण्यात आलं आहे. अद्याप याबाबत निवडणूक आयोगाने कोणतही उत्तर दिलं नसल्याचं राजेसाहेब देशमुख यांनी सांगितलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें