देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ, एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप; बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेंच सुरु आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही. मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार आहे, असा निरोप एकनाथ शिंदेंनी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहचवला असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या दाव्यात किती तथ्य आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे अशी भाजपची इच्छा आहे. याबाबत एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडची चर्चा देखील सुरु असल्याचं बोललं जात आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय यंत्रणेकडून नेते मंडळीकडून दोन ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यात पहिलं म्हणजे की उपमुख्यमंत्री पद देण्यात येईल आणि दुसरं म्हणजे केंद्रात स्थान देण्यात येईल. एका एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी वेगळी नावं सुचवलं जाण्याची शक्यता आहे. या ऑफरनंतर मुख्यमंत्र्यांनी भेटी-गाठी टाळल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन तयार होणाऱ्या सरकारमध्ये दिसणार की नाही ह्या प्रश्नावर चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. २३ तारखेनंतर एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगले आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण एकत्रित झालेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलणे तसे टाळले आहे, तसेच आमदार, खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत, त्यांच्या मौनाचे नेमके काय कारण हे कळू शकले नसले तरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.