अखेर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शर्यतीतून बाहेर
योगेश पांडे/वर्ताहर
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी कालच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी कालच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत आपला राजीनामा सुपूर्द केला होता. यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच का बोलत नाहीत? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची बातमी समोर येत होती. तसेच एकनाथ शिंदे यांना सव्वा वर्ष तरी मुख्यमंत्रीपद हवं, अशी चर्चा सुरु होती. पण भाजपकडून ते मिळत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या सर्व चर्चांवर आणि याबाबतच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. आपण नाराज नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्ही महायुतीचे लोक आहोत. त्यांनी अडीच वर्ष मला पाठिंबा दिला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. वरिेष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य. आमचं पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे”, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.
तुम्हाला वाटत असेल कुठे घोडं अडलं. मी मोकळा माणूस आहे. मी धरून ठेवणं, ताणून ठेवणं असा माणूस नाही. मला लाडका भाऊ हे पद मिळालं. ही मोठी ओळख आहे. काल मी मोदींना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना, माझ्यामुळे किंवा कुणामुळे कुठलीही काही अडचण आहे, असं मनात आणू नका. तुम्ही मदत केली. अडीच वर्ष संधी दिली. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल. एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपला अंतिम असेल तसा आम्हाला अंतिम असेल. निर्णय घेताना माझी अडचण आहे का? असं वाटू देऊ नका. एकनाथ शिंदे काही अडचण आहे का असं वाटू देऊ नका. सरकार बनवताना माझा अडसर ठेवू नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल. मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. जीवन में असली उडान बाकी है अभी तो नापी है, मुठ्ठीभर जमीन अभी तो सारा असमान बाकी है! अजून खूप काम करायचं आहे. राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. मोदींनी देशाचं नाव जगभर रोशन केलं. आज देश आत्मनिर्भर झाला आहे. आत्म सन्मान झाला आहे. आपले रिलेशन इतर देशांसोबत डेव्हलप झाले आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. त्यामुळे कोणती कोंडी काही राहू नये हे सांगण्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो मान्य असेल. भाजपला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची बैठक होणार आहे. भाजपची बैठक होणार आहे. त्यात ते निर्णय घेतील. कोंडी, अडसर, नाराजी नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही. नाराजी नाही. जो निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतील त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे.
सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचं होतं. ते मोदी आणि शाह यांनी पूर्ण केलं. ते माझ्यापाठी पहाडासारखे राहिले. मी अडीच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. दिवस-रात्र काम केलं. कॉमन मॅनचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. लाडका भाऊ ही माझी ओळख झाली. ही ओळख सर्वात मोठी आहे. दोन-चार दिवसांपासून आम्ही नाराज असल्याची चर्चा आहे. पण आम्ही नाराज होणारे नाही. आम्ही घरात बसणारे नाही. आम्ही एकत्रपणे काम करू. आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. आता महायुतीचं सरकार भक्कमपणे काम करणार आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.