रविवारी मविआच्या आमदारांनी घेतली शपथ; मात्र ठाकरे गटाच्या दोन आमदार गैरहजर.चर्चांना उधाण?
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानसभेत पार पडला. मविआने शपथविधीवर पहिल्या दिवशी बहिष्कार असणार असल्याचे जाहीर केले. तर, दुसऱ्या दिवशी सगळेच आमदार शपथ घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रविवारी मविआच्या आमदारांनी शपथ घेतली. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या दोन सदस्यांनी शपथ घेतली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर शंका घेत बॅलेटवर मतदान करण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रशासनाने दबाव टाकत हे मतपत्रिकेवरील अभिरुप मतदान प्रक्रिया हाणून पाडली. त्याशिवाय, राज्यातील जनतेला विधानसभा निवडणूक निकालावर शंका असल्याचे सांगत महाविकास आघाडीने बहिष्काराचे अस्त्र उगारले होते. त्यानंतर रविवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. मात्र,रविवारी शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार अनुपस्थित राहिले.
शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. वांद्रे पूर्व मतदारसंघाचे वरुण सरदेसाई आणि भायखळा मतदारसंघाचे मनोज जामसुतकर हे अनुपस्थित राहिले. वरुण सरदेसाई हे शनिवारी, विधानसभेत हजर होते. मात्र, मविआने बहिष्काराचा निर्णय घेतल्याने त्यांना शपथ घेता आली नाही. तर,रविवारी वरूण सरदेसाई पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मुंबई बाहेर असल्याकारणाने शपथ घेऊ शकले नाही. भायखळ्याचे नवनिर्वाचित आमदार मनोज जामसुतकर हे प्रकती बरी नसल्याने अधिवेशनात अनुपस्थित होते. जामसुतकर हे रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे त्यांना शपथ घेता आली नाही. विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपाल हंगामी अध्यक्षांची निवड करतात. त्यानंतर आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली जाते. आता, विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. नव्या सदस्यांना आता विधानसभा अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात अथवा सभागृहाचे कामकाज सुरू असल्यास सभागृहात सदस्यत्वाची शपथ देतील. तोपर्यंत या नवनिर्वाचित आमदारांना सभागृहाच्या कोणत्याही कामकाजात सहभागी होता येणार नाही.