भाजप कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती, पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी अखेर माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. घोषणा प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी रविंद्र चव्हाण यांच्या् नावाची केली. राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता चव्हाण प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. महायुती सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्षपदी नवी नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तर रविंद्र चव्हाण यांच्या आधी नव्या कार्यकारी अध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीष महाजन यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र महाजन यांची वर्णी मंत्री पदावर लागल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदी चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. अखेर शनिवारी महाराष्ट्र भाजपचा शिर्डी येथे महाविजयी मेळावा सुरु असतानाच रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवित महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद देण्यात आले नव्हते आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार याची चर्चा सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वीच चव्हाण यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे समोर आले होते. त्यांची पक्षाच्या नव्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी देताना संघटन पर्व प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासूनच चव्हाण यांच्याकडे आणखीन एक मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
रविंद्र चव्हाण हे कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. निवडणुकांचे योग्य मॅनेजमेंटही त्यांना अवगत असून त्यांनी नेहमीच आपला कामातून ठसा उमटवला आहे. ठाणे,पालघरसह कोकण मध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी अतिशय महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. लवकरच मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकामध्ये भाजपाच्या यशाचा आलेख आणखीन चढता ठेवण्याची मोठी जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्याकडे असणार आहे आणि त्यामुळे ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे.