निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आक्रमक; २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर करणार आंदोलन
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहेत त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करुन जनजागृती करणार आहे. या आंदोलनात राज्यातील महत्वाचे नेतेही सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती पण अजून ही आकडेवारी दिलेली नाही. निवडणूक आयोगाला अशी माहिती देता येणार नाही असा कायदाच आता केंद्रातील भाजपा सरकारने केला आहे. हा कायदा म्हणजे निवडणूक आयोग व भाजपाने मतदारांच्या मतदानावर टाकलेला दरोडा लपवण्याचा प्रकार आहे.