पालकमंत्रिपदावरुन वाद पेटला! रायगड जिल्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भरत गोगावले समर्थक आक्रमक
योगेश पांडे/वार्ताहर
रायगड – राज्यातील पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा कलह सुरु आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन हा सर्व राडा पाहायला मिळत असून अदिती तटकरेंच्या नावाला भरत गोगावले समर्थकांकडून जोरदार विरोध होत आहे. अशातच आता रायगडमधील सर्व शिवसैनिकांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. मात्र अदिती तटकरे यांच्या नावाला शिवसेनेकडून जोरदार विरोध होत असून भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद देण्याची मागणी होत आहे. यावरुनच आक्रमक भूमिका घेत शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. भरत गोगावले यांची जोपर्यंत पालकमंत्री म्हणून घोषणा होत नाही तोपर्यंत संघटनेचे काम करणार नाही, अशी भूमिका गोगावले समर्थकांनी घेतली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यापासून भरत गोगावले यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. आज भरत गोगावले समर्थकांकडून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वात शेकडो समर्थकांनी मुंबईत दाखल होत शक्तिप्रदर्शन केले. तसेच सायंकाळी पाच वाजता मुक्तागिरी बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदनही दिले. रायगडच्या पालकमंत्री पदी भरत गोगावले यांचे नाव जाहीर करावं, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, भरत गोगावले यांच्या समर्थकांकडून मुक्तागिरी बंगल्याबाहेर हुल्लडबाजीही करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत अरेरावी केल्याने तसेच मुक्तागिरी बंगल्याचे गेट आणि रस्ता अडवून धरल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना घोषणा बंद करण्याचे आदेश दिले तसेच साहेबांना केवळ निवेदन देऊन आणि आभार माना आणि परत फिरा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.