मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी छत्रपतींची शपथ घेऊन केला ईडीबाबत खुलासा, ईव्हीएमसंदर्भात उपस्थित केली शंका
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – महाराष्ट नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा गुरुवारी मुंबईमध्ये पार पडला. विधानसभा निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिल्यांदाच पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांशी जाहीरपणे संवाद साधला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन शंका उपस्थित केली. राज्यात विधानसभेच्या निकालानंतर सन्नाटा का होता? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मला ईडी का लागली? याबाबतचा सविस्तर खुलासाच केला. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन हे सांगतो आहे. २००५ ची ही गोष्ट आहे. मी व्यवसाय सुरू केला होता. मी बातमी वाचली की सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की एनटीएससी च्या मिल विका आणि कामगारांचे पगार आहे ते देऊन टाका. त्यामध्ये कोहीनूर मिलचाही समावेश होता. आम्ही त्यासाठीचे टेंडर भरले. माझ्या पार्टनरचा घाबरत फोन आला की, आपल्याला टेंडर लागलं, ४००-५०० कोटींचे ते टेंडर होते, इतके पैसे आणायचे कुठून ? आयएल अँड एफएस शी आम्ही बोललो, त्यांनी ते पैसे भरण्यास होकार दिला. “आम्ही ७- ८ भागीदार होतो. मग कोर्टकचेऱ्या झाल्या, त्या दरम्यान मी सांगितलं की हे आपल्याला झेपणारं नाही आपण यातून बाहेर पडू. २००८ साली आम्ही आमचा स्टेक विकून बाहेर पडलो. त्यानंतर आमचा विषय संपला. ईडीची नोटीस आली तेव्हा त्यात कोहीनूर मिलचा विषय होता. ईडीची माणसे काय बोलत होते हेच मला कळत नव्हते. पैसे मिळाले होते त्यावर मी टॅक्सही भरला होता. सीएला बोलावलं तेव्हा त्याने सांगितलं की एका पार्टनरने टॅक्सचे पैसे भरले नाही ते परस्पर बाहेर वापरले. त्यामुळे आम्ही सीएच्या सल्ल्यानुसार टॅक्स भरला, विषय संपला.इतक्याशा गोष्टीला मी ईडीला घाबरून मोदींची स्तुती करायला लागलो ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान, मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत, विजयही पाहिलेत. पराभवाने खचून जाणारा मी नाही, पक्षाशी भूमिका आणि तुमचं प्रेम मी कोणासमोर लाचार ठेवणार नाही. पक्षामध्ये शिस्त आणण्यासाठी वरपासून, खालीपर्यंत बदले केले जातील. पक्षामध्ये आचारसंहिता आणली जाईल, असे सर्वात मोठे विधानही राज ठाकरे यांनी केले.