राज ठाकरेंना स्वत:चा मुलगा निवडून आणता आला नाही, त्यांनी आम्हाला सांगू नये – अजित पवार
मनसेच्या मेळाव्यात विधानसभा निकालावर राज ठाकरेंच्या भाष्यावर अजित पवारांचा टोला
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकांवरील निकालावरुन अद्यापही आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ईव्हीएमच्या घोळामुळेच महायुतीचा विजय झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात विधानसभा निकालावर भाष्य करताना, लोकांनी आपल्याला मतं दिली पण ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही, असे वक्तव्य केले होते. तसेच, ईव्हीएमच्या घोळामुळेच महायुतीचा विजय झाल्याचेही त्यांनी सूचवले होते. आता, राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून राज ठाकरेंना स्वत:चा मुलगा निवडून आणता आला नाही, त्यांनी आम्हाला सांगू नये, अशा शब्दात पलटवार केला आहे. तर, राहुल गांधींच्या आरोपावरही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. राहुल गांधी यांनी तपासणीसाठी स्वतःची टीम लावावी, ८ तारखेला दिल्लीचा निकाल आहे, म्हणून त्यांचं रडगाणं सुरु आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदार सुप्रिया सुळेंसह केलेल्या आरोपावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यातून महायुतीच्या विजयावर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच, मनसेच्या उमेदवाराला एका मतदान केंद्रावर एकही मत पडले नसल्याचा दाखला देत लोकांनी आम्हाला मतं दिली, पण ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाहीत. जर निवडणुका अशाच होणार असतील तर न लढलेल्या बरं असे म्हणत राज ठाकरेंनी ईव्हीएमकडे बोट दाखवलं होतं.
राज ठाकरे यांचे कार्यकर्ते डी-मॉरलाईज झाले आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर टिका केली आहे. लोकसभेला आमच्या फक्त १७ जागा आल्या, तेव्हा आम्ही रडत बसलो नाहीत. तुम्हाला तुमच्या मुलगा निवडून आणता आलं नाही, तुम्ही आम्हाला गप्पा मारता. त्यावेळी, आम्ही मेहनत केली, कष्ट घेतले. एका निवडणुकीत मलाही माझ्या मुलाला निवडून आणता आलं नाही, मलाही माझ्या पत्नीला निवडून आणता आलं नाही. त्यामध्ये, ईव्हीएमला दोष देण्यात काय अर्थ आहे, असा पलटवार अजित पवारांनी केला. तसेच, तुम्हाला मतं गेली नाहीत, मग केली कुठं मतं?, असेही अजित पवारांनी म्हटलं. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांना पैसे दिले आहेत, त्यांचे पैसे परत घेणार नाही. पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही त्यांनी भाष्य केलं. कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कारवाई होणार नाही. अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांनी आपली बाजू मांडली आहे, त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर, कारवाई केली जाईल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.