महाविकास आघाडीच्या सरपंचांना एक रुपया निधी मिळणार नाही, ज्यांना निधी पाहिजे त्यांनी पक्ष प्रवेश करावा, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्याच्या राजकारणात सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आक्रमक वक्तव्य केलंय. ‘ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे किंवा ज्याठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही’, असा इशारा मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी दिलाय. इतकेच नाही तर निधी हवा असेल तर आमच्याकडे या आणि प्रवेश करा, असंही राणे यांनी म्हटलंय. ते एका स्थानिक कार्यक्रमात बोलत होते. महायुतीच्याच नेत्यांना आणि सरपंचांना निधी मिळणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत. नितेश राणे त्यांच्या घरातून पैसे देणार आहेत का? असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. अजित पवारांनी माझ्या विरोधात उभं असलेल्या उमेदवाराला भरभरुन निधी दिला तरिही त्यांचा उमेदवार एक लाख मतांनी पडला, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. विश्वगुरू होण्याची भाषा करणारे पंतप्रधान आणि ऑपरेशन ब्लॅकमेलर राबवणाऱ्या पक्षाने हा व्हिडिओ बघितल्यानंतरही या देशात लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे यावर भाषणे द्यायला हवेत काय ? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.
नितेश राणे म्हणाले, आज भाजपचा परिवार वाढत असून लोकांचा विश्वास वाढत आहेत. प्रत्येक राज्यातील नागरिकांनी भाजपलाच संधी दिली आहे. आपल्या राज्यातील नोंदणीने १ कोटींचा टप्पा गाठला असून पक्षाची ताकद वाढत आहे. आपल्या सर्वांची एकच जबाबदारी आहे की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप १ नंबर कसा कायम राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पुढील वर्षी महायुतीच्या उमेदवारालाच निधी मिळणार आहे. येणाऱ्या निवडणुका शतप्रतिशत भाजप म्हणून लढविणार आहोत. १० वर्षात विरोधात असताना खूप मला त्रास झाला आता मी सत्तेत आहे. आपल्या भाजपची ताकद वाढायला हवी. मुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद वाढवा, त्यांचे हात बळकट करा, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय. कोणीही चुकून विरोधकांना मदत करू नका. या जिल्ह्यात महायुतीच्या नेतृत्वाखाली काम करू, असंही आवाहनही नितेश राणे यांनी केलंय.