मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक, देवेंद्र फडणवीस यांचा संताप; कुणीही असो, कारवाई करण्याचा इशारा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवर रागावले अशी माहिती आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या आधीच माध्यमांमध्ये अजेंडा छापून येत असल्याने फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असं स्पष्ट सांगितलं. थोडक्यात काय तर मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक करणाऱ्यांची खैर नाही असा गंभीर इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या सगळ्याला कारणही तसंच होतं. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये डान्सबार संदर्भात चर्चा होणार होती. मात्र बैठकीच्या आधीच बऱ्याच मिडियांनी बातमी दाखवली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झाले. विरोधकांनीही यावरुन आपले हात धुवून घेतले.
महायुती सरकारमधील नेत्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री भरत गोगावले म्हणाले की, मंत्रिमंडळाचा अजेंडा कोणी फोडला याची चौकशी सुरू आहे. मंत्री आणि त्याच्या पीएसनीही हा अजेंडा गुप्त ठेवायचा असतो. ज्यांनी हा अजेंडा फोडला आहे तो कोणीही असो, त्याच्यावर कारवाई होईल.
पूर्वी निर्णय लीक होत होते. या पुढच्या काळात तशा प्रकारची गुप्तता पाळली जावी. कारण गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो. ती शपथ तंतोतंत खरी ठरवण्याची फडणवीस यांची इच्छा आहे आणि त्या धर्तीवर काम सुरू आहे असं मंत्री निलेश राणे यांनी म्हटलंय. मोदी सरकार असो की फडणवीस सरकार, गुप्तता हाच यांचा यूएसपी राहिला आहे. केंद्र असो की राज्य गेली १० वर्षे सरकारकडून सर्व गोष्टींमध्ये अतिशय गुप्तता पाळली जात आहे. अशा पद्धतीने बातम्या लीक व्हायची सवय नसल्याने फडणवीसांचा चांगलाच संताप झाल्याचं दिसून आलं.