• Mon. Mar 17th, 2025

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीलम गोऱ्हेंवर शिंदे गटातील नेते नाराज; नीलम गोऱ्हे यांनी स्वतः त्यावर बोलावं अशी मागणी

ByPolitical Views

Feb 25, 2025



वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीलम गोऱ्हेंवर शिंदे गटातील नेते नाराज; नीलम गोऱ्हे यांनी स्वतः त्यावर बोलावं अशी मागणी

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्या की ते एक पद देतात, असे वक्तव्य केल्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख नेते त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडले होते. एकीकडे जहरी टीका आणि अब्रुनुकसानीचा दावा, अशा दुहेरी कात्रीत नीलम गोऱ्हे सापडल्या आहेत. अशात आता शिंदे गटातील सहकारीही त्यांच्या मदतीला पुढे येत नसल्याची माहिती समोर आली आहे. किंबहुना शिंदे गटात नीलम गोऱ्हे यांच्याविषयी नाराजी पसरली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या विधानाबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशाप्रकारचं वक्तव्य करण्याची गरज नव्हती, असे पक्षातील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. गरज नसताना आणि अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला डॅमेज झाल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः त्यावर समोर येऊन बोलावं, अशी भूमिका शिंदे गटातील या नेत्यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे आता नीलम गोऱ्हे प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाच्या संजय राऊत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात टीकेची राळ उठवली होती. मात्र, संजय शिरसाट आणि प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा अपवाद वगळता शिंदे गटातून नीलम गोऱ्हे यांच्या बचावासाठी फार कोणी पुढे आले नव्हते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनीही नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें