देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य, मग भाजपा सरकारने कोणाचा विकास केला? काँग्रेस खासदाराचा सवाल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात ८० कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या लाभार्थी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग ११ वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील रेशनकार्ड धारकांना कोराना काळात मोफत धान्ये देण्यास सुरुवात केली होती. मात्र, कोरोना गेल्यानंतर देखील सरकारकडून या मोफत धान्य योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता, पुढील ५ वर्षांपर्यंत नागरिकांना मोफत धान्य मिळत आहे, त्यावरुन, काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. लोकसभेत खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्न क्रमांक १९४ अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार महाराष्ट्रातील सुमारे ७००.१७ लाख व्यक्तींना म्हणजे ७ कोटी १७ लाख नागरिकांना या योजने अंतर्गत मोफत धान्याचा लाभ मिळत आहे. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जानेवारी २०२५ मध्ये ३ लाख ८३ हजार ७६६ टन धान्य वाटप करण्यात आले असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या या योजनेंतर्गत समाविष्ट आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य घराणीसाठी वितरित, यामध्ये एससी/ एसटी/ओबीसी कुटुंबांचाही समावेश आहे. तर देशभरात ८१.३५ कोटी लाभार्थ्यांपैकी ८०.५६ कोटी नागरिकांना मोफत धान्य मिळत आहे.
सरकारची आकडेवारी पाहता केंद्र सरकारच्या विकासाचे मोठे दावे फोल ठरत आहेत. ८० टक्के जनतेला ५ किलो मोफत धान्य द्यावे लागत असेल तर विकास गेला कुठे, मुठभर लोकांचा विकास म्हणजे सर्व समाज घटकांचा विकास नाही. सरकारची आकडेवारीच सांगते आजही बहुसंख्य लोक गरिबीत जीवन जगत आहेत. २०१४ पासून देशात गरिब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढत असल्याचे ही आकडेवारीच सांगत असून ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.