दाऊद इब्राहिम व छोटा शकील यांना क्लीनचीट दिल्यास आश्चर्य वाटणार नाही – संजय राऊत
चार जून नंतर शिंदे गट आणि अजित पवार गट हे दाेन्ही राजकारणातून नामशेष होतील
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – येत्या चार जून नंतर एकनाथ शिंदे गट हा पूर्णपणे संपलेला असेल. त्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही. तुम्ही कोणतेही गीत तयार करा किंवा अजून काय तयार करा. एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट हे दाेन्ही गट चार जून नंतर या राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे नामशेष झालेले असतील असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार राऊत यांनी मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत यांनी पंतप्रधान माेदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. संजय राऊत म्हणाले नरेंद्र मोदी हे निवडणुका हरणार आहेत. चार जून नंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेत नसेल. देशात ७० वर्षापर्यंत त्यातील ५० वर्ष काँग्रेसने प्रधानमंत्री दिला आहे. सर्वात चांगले प्रधानमंत्री झालेत.
या सर्व प्रधानमंत्र्यांनी जो देश बनवला आहे तो देश विकण्याचा काम एकच प्रधानमंत्री करत आहेत ते म्हणजे मोदी असेही राऊत यांनी नमूद केले. ज्यांच्याकडे बहुमत आहे तो त्या पदापर्यंत जाईल. दहा वर्षापर्यंत तुमच्याकडे बहुमत होतं तुम्ही प्रधानमंत्री बनलात आमच्याकडे एकाहून जास्त चेहरे प्रधानमंत्री पदासाठी असल्याचे म्हटले. राऊत पुढं बाेलताना म्हणाले भाजपची वॉशिंग मशीनसह क्लीनचीटची फॅक्टरी देखील आहे. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, विजय मल्ल्या, निरव मोदी या सर्व लोकांना देखील भाजप क्लीनचीट देऊ शकते. यांना जर निवडणुका जिंकायच्या असतील तर यांचा आधार त्यांना घ्यावा लागणार आहे.
दहशत माजवण्यासाठी आणि देश लुटण्यासाठी उद्या जर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना क्लीनचीट देण्याची बातमी आली तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असा टाेला राऊत यांनी लगावला. सांगली मतदारसंघात आमच्या पैलवान चंद्रहार पाटीलशी लढत द्यायला एक उमेदवार संजयकाका पाटील कमी पडत आहे. त्यामुळे भाजपने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला आहे, असे विशाल पाटील यांचा नामाेल्लेख टाळत खासदार राऊत म्हणाले यावर आम्ही योग्य वेळी बोलू या मागे कोण आहे, कोणाची प्रेरणा आहे कोणाची ताकद आहे.
हे भाजपचा कारस्थान आहे भाजपला सांगलीची निवडणूक सोपी जात नाहीये, चंद्रहार पाटील हे झपाट्याने पुढे जात आहे लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतोय त्यामुळे घराघरात भरलेले लिफाफे वाटण्यासाठी भाजपने अप्रत्यक्षपणे दुसरा उमेदवार आणलाय का, या संदर्भात लोकांच्या मनात शंका आहे असेही राऊत यांनी नमूद केले.