ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के
नवी मुंबईतील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना अटक तर रत्नागिरी युवासेना जिल्हाध्यक्ष अजिंक्य मोर यांना तडीपारीची नोटीस
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. उद्धव ठाकरे यांचे प्रमुख शिलेदार आणि नवी मुंबईतील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर रत्नागिरीतील ठाकरे गटाचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य मोर यांना देखील तडीपारीची नोटीस देण्यात आली. एकाच दिवशी दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एम. के. मढवी यांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. ऐरोलीतील सेक्टर ५ मधील कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील एका ठेकेदाराकडून मढवी यांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ठेकेदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. याच प्रकरणामध्ये मढवी यांच्यावर खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. पोलिसांनी मढवी यांना नवी मुंबई येथून ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी मढवी यांना ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत नेण्यात आलं आहेत. मढवी यांच्या अटकेची वार्ता कळताच त्यांच्या पत्नी आणि मुलं देखील खंडणी विभाग कार्यालयात पोहोचले.
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरीतील युवा सेना जिल्हाप्रमुखांना पोलिसांना तडीपारीची नोटीस बजावली गेली आहे. अजिंक्य मोरे यांच्यावर दाखल असलेल्या खेड पोलीस ठाण्यातील ७ गुन्ह्यांचा दाखला देत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आमदार राजन साळवी यांच्या कारवाईच्या वेळेला प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.