शरद पवार यांचं कुटुंब फोडलं, दरोडा टाकला, चिन्ह चोरलं; कपिल पाटीलांकडून फक्त हप्ते वसुली – रोहित पवार
बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचार सभेत रोहित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर साधला निशाणा
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर सडकून टीका केली. रोहित पवार यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावरही निशाणा साधला. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शहापूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत रोहित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला. शरद पवार यांचं कुटुंब फोडलं. त्यांनी दरोडा टाकला. आपलं चिन्ह चोरलं. बाळ्या मामा यांची उमेदवार जाहीर झाली तेव्हा त्यांच्या कंपनीवर कारवाई केली. कपिल पाटील हे खासदार आहेत. त्यांनी इकडे एक तरी कंपनी आणली का? फक्त हप्ते घेतले जातात,असा टोला रोहित पवार यांनी लगावला. बदल घडवून आणायला तयार आहात का? एकही हॉस्पिटल नाही. मग कशाला मंत्री झाले? फक्त हप्ते खायला?”, असा घणाघात रोहित पवार यांनी केला. कपिल पाटील जे आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि ते इकडे वापरतील?, असंही रोहित पवार म्हणाले.
भाजप कोणत्याही प्रकारे सत्तेत येता कामा नाही. आपले महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात ३५ खासदार निवडून येतील. भाजप २०० च्या पुढे जाणार नाही आणि सत्तेत येणार नाही”, असा दावा रोहित पवार यांनी केला. “आपलं कुठलं चिन्ह आहे ते म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस. भाजपला जेव्हा समजतं की आपला उमेदवार निवडून येत नाही तेव्हा ते अपक्ष उमेदवार उभे करतात आणि लोकशाही फोडतात”, अशी देखील टीका रोहित पवारांनी यावेळी केली. बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचाराला ही सभा होत आहे. या भूमीबद्दल आपण जेव्हा विचार करतो, या भूमीमध्ये पवित्र असा माऊली किल्ला आहे. मानस मंदिर आहे. खर्डीला देवीचे मंदिर आहे. तसेच खंडोबाचं मंदिर आहे. या सगळ्यांनी पावन झालेली ही भूमी आहे. इथे येऊन आम्हा सगळ्यांना आनंद झाला. पण मी आपल्या सर्वांना विचारतो ही जी लढाई आहे, फक्त दोन उमेदवारांच्यामधली उमेदवारी नसून ही लढाई एक विचारांची लढाई आहे. या विचाराच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित यावे लागेल. त्यामुळे शहापूरच्या जनतेला मी विचारतो, आपण सर्वजण एकत्रित भाजप सारखा जो विचार त्यांच्या सर्व मित्रपक्ष आहेत त्यांच्या विरोधात लढायला तयार आहोत का?”, असं रोहित पवार यांनी विचारलं.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो. नाशिक, या भागांमध्ये फिरलो, तर तिथे असल्यावर आवाज जरा थोडा जास्त वाटतोय. बाळूमामांच्या विरुद्ध फार मोठी ताकद आहे भाजपची. भाजपकडे पैसे आहेत, पण तरी आपण लढाईला तयार आहोत. मराठा समाजाला, कुणबी समाजाला भाजपने फक्त सत्तेत येण्यासाठी वापर केला. लोकांची आमच्याशी चर्चा जेव्हा केली तेव्हा आम्हाला एवढंच कळालं की, ठराविक नेत्यांच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनाच इथे फायदा झालेला आहे. या भागात पाणीटंचाई मोठी आहे”, असं रोहित पवार म्हणाले.