मनोज जरांगे पाटलांची चार जूनपासून उपोषणाला बसण्याची घोषणा; निवडणूकीपूर्वीच नवा डाव
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा चार जूनपासून उपोषणाला बसण्याची तयारी करत आहेत. चार जूनपूर्वी जर सगे सोयरे तसेच मराठा आणि कुणबी एकच आहेत या मागण्या मान्य केल्या नाहीत तर चार जून पासून अंतरवाली सराटीत सकाळी ९ वाजता ते आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान आठ जून रोजी ते नारायण गड येथे समाजाची बैठक सुद्धा घेणार आहेत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीराजे महाराज यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, मराठ्यांची भीती लोकसभेच्या निवडणुकीत दिसली. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही विधानसभेत सगळ्यांना घरी बसवू अशी प्रतिक्रिया मनोज जरंगे पाटील यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र्य आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र अजूनही जरांगे पाटील हे कुणबीमधून आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. जर आरक्षण मिळालं नाही तर चार जूनपासून उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सोबतच विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचं देखील त्यांनी यापूर्वी म्हटलं आहे.