नरेंद्र मोदींनंतर योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो; उज्वल निकम यांच्यासाठी उतरणार मैदानात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लोकसभा निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रकिया होणार आहे. यासाठी केवळ ४ दिवस राहिले असताना सर्वंच राजकीय पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो केला,तर १७ मे रोजी शिवाजी पार्कमध्ये नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील मुंबईत रोड शो करणार आहेत. महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. उज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथे १८ मे रोजी होणार रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर उत्तर भारतीय मतांसाठी योगी आदित्यनाथ देखील आता मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आणि भाजपकडून प्रख्यात वकील उज्ज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे कालपर्यंत फारशा चर्चेत नसलेला उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ अचानक लाईमलाईटमध्ये आला आहे. या मतदारसंघात दोन तगड्या उमेदवारांची घोषणा झाल्याने उत्तर-मध्य मुंबईत हायव्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. उज्ज्वल निकम यांच्याविरोधात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट दिले आहे. वर्षा गायकवाड या एक अनुभवी राजकारणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मुंबईत काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. विशेष म्हणेज महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) या पक्षानेदेखील वर्षा गायकडवाड यांच्यासाठी प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात गायकवाड यांना तोंड देणं हेदेखील निकम यांच्यापुढील महत्त्वाचे आणि मोठे आव्हान आहे. त्यामुळे निकम यांना उमेदवारी मिळाली असली तरी त्यांच्या अंगाला विजयाचा गुलाल लागणार का? असे विचारले जात आहे. येत्या चार जून रोजी मतमोजणी झाल्यानंतरच हे स्पष्ट होईल.