संजय राऊतांच्या आरोपांनंतर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘जड’ बॅगांची तपासणी
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये शिंदे गटाकडून पैसेवाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर गुरुवारी पुन्हा नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी रोड शो मध्ये सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आले. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री पुढे निघून गेले. मात्र, त्यांच्या मागून बॅगा घेऊन येत असलेल्या लोकांना थांबवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शिंदे यांनी सोबत आणलेल्या सर्व बॅगा उघडून कसून तपासणी केली. या बॅगांमध्ये कॅमेराचे साहित्य आणि इतर गोष्टी आढळून आल्या. संजय राऊत यांनी आरोप केल्याप्रमाणे बॅगांमध्ये कोणतेही पैसे आढळून आलेले नाहीत. या बॅगांची तपासणी करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रितसर शुटिंगही केले आहे. एकनाथ शिंदे यांनी या कृतीतून अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. मात्र, हा प्रकार म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ठरवून केलेली नौटंकी आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. हा दौरा अवघ्या दोन तासांचा असला तरी त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या अंगरक्षकांकडे मोठ्या सुटकेस दिसून आल्या होत्या. या जड बॅगांमध्ये काय आहे? मुख्यमंत्री अवघ्या दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का घेऊन आले?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी आणलेल्या बॅगांमध्ये १२ ते १३ कोटी रुपये होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.