मोदी नंतर मुख्यमंत्री शिंदेंची गॅरंटी, राज्यात आम्हाला विकासाच्या जोरावर ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान मी राज्यभर प्रवास करत प्रचार केला. लोकांना विकास पाहिजे आणि महायुतीच्या सरकारने राज्यात विकास केलाय. त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी आज २० मे रोजी मतदान होत आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा आणि इतर सात अशा १३ मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ठाणे आणि कल्याण लोकसभेचा समावेश असून पोलीस आणि प्रशासन देखील सज्ज झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईमध्ये ४ हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडल्यानंतर ही निवडणूक आता सर्वार्थाने अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या निवडणुकांवर भाष्य करत आपल्या विजयाची गॅरंटीच दिली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांकांसाठी खुप काम केलय. त्यामुळे यंदा अल्पसंख्याक मोठ्या संख्येने मतदान करतील, असा विश्वास देखील यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. राज्यात जनतेला विकास हवा आहे. महायुतीच्या सरकारने आज सर्व क्षेत्राचा विकास केला आहे. त्यामुळे मतदारांचा कौल आमच्याच बाजूनी असून आम्हाला आम्हाला राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलताना व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मतदान लोकशाहीचा हा पवित्र अधिकार आहे,त्यामुळे आपण सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सर्वांना विकास हवा आहे आणि विकास करणार,आमचा सरकार आहे. आमचा अजेंडा हा विकासाचा आहे. टोरेंट विद्युत कंपनी बाबत अनेक तक्रारी मला कळाल्या आहेत, आमचं सरकार सामान्य नागरिकांसोबत आहे. निवडणुका होताच टोरंट बाबत आम्ही बैठक घेऊन लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.