ईशान्य मुंबईत राडा, राऊत बंधू थेट पोलिसांनाच भिडले; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतलं ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ईशान्य मुंबईतील एका मतदान केंद्रावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बूथ टेबलवर डमी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलं होतं. डमी मशीन ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची देखील झाली. कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी राऊत यांनी केली. दरम्यान त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना गंभीर आरोप केले आहेत. ‘भाजपाचे लोक पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना ताब्यात घेण्यास सांगत आहेत. निवडणूक आयोग सध्या भाजपाची शाखा म्हणून काम करत आहे. भाजपाला विजयाची खात्री नाही म्हणून भीतीपोटी अटक केली जात आहे’, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही पंजाला मतदान करतो. कमळाबाईने देशाची वाट लावली आहे. रडीचा डाव म्हणजे आमचं चिन्ह चोरणं होय. आमच्या महाराष्ट्रात ३५ पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा निवडून येतील. भाजपाला विजयाची खात्री नाही म्हणून भीतीपोटी अटक केली जात आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.