नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल, ईव्हीएम मशीनला हार घालणं पडलं महागं
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पुजा करून वंदन केले होते. हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील घटनेची माहिती मागवली होती. आता शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मधील मतदान केंद्रातील मतदान कक्षावर गळ्यातील हार टाकणे शांतीगिरी महाराजांना भोवले आहे. यामुळे शांतीगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला मतदान केंद्रावर चिठ्ठ्या वाटताना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर अंबडच्या हद्दीत कार्यकर्त्यांच्या कुर्त्यांवर जय बाबाजी असा शब्द लिहिल्याने पोलिसांनी यावर आक्षेप घेतला. यामुळे शांतीगिरी महाराज नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात का घेतले? असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला आहे. मात्र बाबाजी हे उमेदवाराचे नाव नाही आणि चिन्ह देखील नाही, असा दावा शांतीगिरी महाराजांकडून करण्यात आला. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शांतीगिरी महाराज म्हणाले की, आम्ही सर्वात देव बघतो, ईव्हीएममध्ये पण देव आहे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजाकरून वंदन केले हा आदर्श आचारसंहिते उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे शांतीगिरी महाराज यांनी सांगितले.
मी एव्हीएमला हार घातला नाही, कक्षात खर्ड्यावर भारत मातेचे चित्र होते त्याला हार घातला. आयोगाने आम्हाला आदर्श आचारसंहितेचे नियमावली दिली नाही, आदर्श आचारसंहितेचे नियम माहीत असता तर हे कृत्यच केले नसते. गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात माझे वकील नियमानुसार कार्यवाही करतील, अशी प्रतिक्रिया शांतीगिरी महाराजांनी दिली आहे.