देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच बजावला मतदानाचा हक्क; भिवंडीच्या मतदान केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाची रणधुमाळी सध्या देशात रंगताना दिसत आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व निवडण्याची संधी आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला मतदानाने दिला आहे. या मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी प्रशासन सर्व स्तरावर कसोशीचे प्रयत्न करत असते. मात्र, भिवंडीच्या एका मतदान केंद्रावर देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. भिवंडी शहरातील रेड लाइट एरिया म्हणून हनुमान टेकडी परिसर ओळखला जातो. येथील देह विक्री करणाऱ्या महिलांची आलीकडे मतदार नोंदणी झाल्याने त्यांनी प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी आपण देखील या देशाचे नागरिक असून आज लोकशाहीचा एक भाग झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. भिवंडी शहरातील रेड लाइट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान टेकडी परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीत साई सेवा संस्थेच्या माध्यमातून मतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नोंदणीनंतर या महिलांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम देखील राबवला गेला. त्यानंतर आज या वस्तीतील असंख्य महिलांनी साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती सिंह यांच्या नेतृत्वाखाली खदान रोड येथील जे जे गुप्ता हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. आम्ही महिला सुध्दा देशाच्या नागरीक असून आम्हाला सुध्दा मतदानाचा हक्क असल्याने आम्ही तो प्रथमच बजावत आहोत. मात्र, आमच्याकडे देखील शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी देह विक्री करणाऱ्या एका महिलेने बोलून दाखवली आहे.
देह विक्री करणे ही या महिलांची मजबुरी असली तरी त्या पाहिले भारतीय नागरिक आहेत. त्यांना सुध्दा संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे. सरकार बनविण्यामध्ये या महिलांचा सुध्दा खारीचा वाटा आहे. त्यांच्या समस्यांकडे सरकारने पाठ फिरवू नये, अशी विनंती साई सेवा संस्थेच्या प्रमुख डॉ. स्वाती सिंह यांनी केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सध्या सुरू आहे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये तृतीयपंथी मतदारांनी देखील आपला हक्क बजावला. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्यासंख्येने तृतीयपंथी मतदार केंद्रावर रांगेत उभे असल्याचे बघायला मिळाले.