आनंद दिघे यांच्या बहिणीला पॅरालिटीक अटॅक, मुख्यमंत्री शिंदेकडून प्रकृतीची विचारपूस .
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरूणा गडकरी यांना पॅरालिटीक अटॅक आल्याने त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याची सूचना शिंदे यांनी दिली. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या अरुणा गडकरी या ज्येष्ठ भगिनी आहेत. त्या ठाण्यात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना पॅरालिटीक अटॅक आला होता. त्यामुळे त्यांच्यावर नितीन कंपनी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अरुणा गडकरी यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी रात्री रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृती बाबतची माहिती डाॅक्टरांकडून घेतली.
अरुणा गडकरी यांना पॅरालिटीक अटॅक आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेण्यासाठी आलो होते. डाॅक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अरुणा गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ज्युपिटर रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने तिथे उपचार करणे सोयीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.