विधान परिषद निवडणुकीसाठी अनिल परब व ज.मो.अभ्यंकर यांची नावे जाहिर; शिवसेना(ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयानं अधिकृत पत्रक केलं जारी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठीचं राज्यातील मतदान पूर्ण झालं असून, देशातही ही निवडणूक आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ४ जून रोजी देशातील या महतत्वाकांक्षी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून, त्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येईल. तूर्तात इथं महाराष्ट्रात एका निवडणुकीचा माहोल शमत नाही, तोच आणखी एका निवडणुकीच्या चर्चांनी जोर धरला असून, त्या धर्तीवर अनेक घडामोडींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर होतात शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शिवसनेना मध्यवर्ती कार्यालयानं यासंदर्भातील अधिकृत पत्रक जारी करत ही माहिती दिली. ज्यामध्ये पक्षाच्या वतीनं अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांच्या नावे उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पक्षाच्या वतीनं परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातून अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटानं उमेदवार जाहीर करत एका अर्थी घेतलेली आघाडी पाहता विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षाकडून आतापासूनच रणनिती आखली जात असल्याचं स्पष्ट होत आहे.
विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर, मुंबई आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांसाठी निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम नुकताच निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमानुसार २६ जून रोजी सदर निवडणुकीसाठीचं मतदान होणार असून, १ जुलै रोजी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल, ७ जून २०२४. तर, अर्ज मागे घेण्याची तारीख असेल, १२ जून २०२४.